अमळनेर (प्रतिनिधी) – जळगांव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सरासरीपेक्षा २५ % देखील पाऊस पडला नसल्यामुळे तीनही जिल्ह्यात दुष्काळाची भयानक अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आमदार अनिल पाटील यांनी काल तातडीने मुंबई गाठून महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री ना.दादा भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन मतदारसंघातील पावसाअभावी पीडित झालेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या.
अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६७० मि.मी. आहे. चालू हंगामात जुन महिन्यामध्ये ७६.६ मि.मी. व जुलै महिन्यामध्ये ९०.८ मि.मी. असे एकुण १६७.४ मि.मी. पर्जन्यमान झालेला आहे म्हणजेच वार्षिक सरासरीच्या तुलनेत २५% पेक्षा कमी पर्जन्यमान झालेले आहे. पावसाने दडी मारल्यामुळे ६८६८५ हेक्टर ऐवढ्या पेरणीयोग्य क्षेत्रापैकी ४३८८८ हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी करण्यात आली आहे. पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे बळीराज्यावर पुन्हा तिसऱ्यांदा पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे बळीराज्याचा चालु वर्षाचा खरीप हंगाम पुर्णपणे कोलमडला असुन बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५% पेक्षा कमी असल्यामुळे तात्काळ पंचनामे करुन अमळनेर विधानसभा मतदारसंघ “दुष्काळग्रस्त” जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५००० रुपये प्रमाणे सरसकट विनाअट सानुग्रह अनुदान जाहीर करणे, शेतीपंपाचे चालु वर्षाचे वीज बील माफ करण्यात यावे तसेच गुरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात याव्या. या प्रमुख मागण्या मंजुर करुन अमळनेर विधानसभा मतदारसंघास “दुष्काळग्रस्त” जाहीर करण्यात यावा अशी विनंती यावेळी आमदारांनी कृषि,महसूल व मदत पुनर्वसन मंत्री महोदयांना केली तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांना देखील मतदारसंघातील दुष्काळाचा सविस्तर अहवाल देण्यात येणार आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मांडल्या व्यथा
मागील आठवड्यात मतदारसंघातील बहुतांश सरपंच व शेतकऱ्यांनी आमदार अनिल पाटील यांची भेट घेऊन मतदारसंघातील दुष्काळाची दाहकता निवेदनाद्वारे मांडली होती, त्याच वेळी आपण लवकरात लवकर प्रशासनाला भेटून तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याच काम करू असा शब्द आमदारांनी दिलेला होता.