भुसावळ तालुक्यातील शिंदी शेतशिवारात घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिंदी येथील नागमई शेती शिवारात गुरुवारी बिबट्याने मारोती मधुकर पाटील यांच्या गायीवर हल्ला करून ठार केले.
सायंकाळी ही घटना समोर आली. घटनास्थळी बिबट्याचे ठसेही आढळले आहेत.
मारोती पाटील यांची परिस्थिती हलाखीची असून यावर्षी पावसामुळे शेती शिवारात नुकसान झाले असताना पुन्हा हे पशुधनाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत सापडले आहे. घटनास्थळी वनविभागाने पंचनामा केला आहे. वनपाल अनिल साळुंखे व वनकर्मी सुनील पाटील उपस्थित होते. या घटनेने शेतकरी आणि शेतमजूर वर्गात घबराट पसरली आहे. बिबट्याच्या भीतीमुळे शेतात काम करण्यासाठी जाण्याची हिंमत होत नसल्याने शेतीच्या कामावर परिणाम होऊ शकतो. याची दखल घेत वनविभागाने बिबट्याच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर शेतकऱ्यांनी सावधगिरीने वावरावे, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.