रावेर तालुक्यातील केऱ्हाळा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील केऱ्हाळा येथील शेतकऱ्याला एका बँकेच्या नावाने ॲपचे लिंक पाठवून त्या माध्यमातून बँक खात्यातून १० लाख २४ हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार दि. १० ऑक्टोबर रोजी समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर तालुक्यातील केऱ्हाळा गावात ४५ वर्षीय शेतकरी हे परिवारासह वास्तव्याला आहेत. शेती करून ते उदरनिर्वाह करतात. दि. १० ऑक्टोबर रोजी त्यांना त्यांच्या व्हॉटसॲप मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून एका बँकेच्या नावाने एपीके फाईल पाठविण्यात आली. (केसीएन)शेतकरी यांनी ॲपच्या लिंकला क्लिक केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईलचा ताबा घेवून त्यांच्या बँक खात्यातून परस्पर १० लाख २४ हजार रूपये अन्य खात्यात ऑनलाईन वळवून फसवणूक केली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकरी यांनी सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे.