अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील डांगरी येथे एका शेतकऱ्याने पीककर्ज फेडता न आल्याने त्या नैराश्यात छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जितेंद्र शांताराम शिसोदे (वय ४२, रा. डांगरी, ता. अमळनेर) असे मयत इसमाचे नाव आहे. तो पत्नी, २ मुले, २ भाऊ परिवारासह डांगरी गावात राहतो. शेतीकाम करून तो उदरनिर्वाह करीत होता. गेल्या अनेक दिवसांपासून घेतलेल्या पीक कर्ज कसे फेडता येईल या विवंचनेत तो होता. त्यातूनच त्याने मंगळवारी २६ रोजी त्याने राहत्या घरी दुपारी छताला साडीने गळफास लावून आत्महत्या केली आहे.
याप्रकरणी मृतदेह ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे हलविण्यात आला होता. तेथे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, याप्रकरणी पोलीस पाटील यांनी व मारवड पोलिसांनी धाव घेत घटनेची माहिती जाणून घेतली. मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोना सुनील तेली करीत आहे.