वसंतवाडी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील वसंत वाडी येथे एका शेतकऱ्याने आपल्या सात वर्षीय चिमुकल्या मुलासमोरच कर्जाच्या तगात्याला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक धक्कादायक घटना बुधवारी दुपारी १२ वाजता घडली. बाळू भंगू पवार (वय- ३५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बाळू पवार हे सकाळी १० वाजता शेतात कापसावर फवारणी मारायचे कारण देत घरातून निघाले. त्यानंतर त्यांनी दुपारी १२ वाजता शेतात विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार बाळू पवार यांचा सात वर्षांचा मुलगा रामेश्वर याच्यासमोरच घडला. लहान मुलाला आधी हा प्रकार समजला नाही. मात्र, विष प्राशन केल्यानंतर बालू पवार यांना त्रास होऊ लागल्यानंतर भांबावलेल्या रामेश्वरने बाजूच्या शेतात काम करत असलेल्या इतरांना बोलावले. इतर शेतकन्यांना बाळू पवार यांनी विष प्राशन केल्याचे लक्षात आल्यानंतर लागलीच जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचार सुरू असतानाच बाळू पवार यांचा
मृत्यू झाला.
सततच्या नापिकीमुळे घेतले होते कर्ज
बाळू पवार हे शेती करत होते. मात्र, सततची नापिकी, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे नुकसान होत होते. त्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी बाळू पवार यांनी कर्जदेखील घेतले होते. आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने भविष्यात पुन्हा पिकांचे नुकसान झाल्यास कर्ज वाढेल, या भीतीने बाळू पवार यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात आले. बाळू पवार यांच्या पश्चात पत्नी लाचाबाई पवार, दोन मुलं, भाऊ असा परिवार आहे.