जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगावात १ नोव्हेंबरला काढण्यात येणाऱ्या शेतकरी मोर्चाची घोषणा करताना आमदार गिरीश महाजनांनी राजकारणही ढवळून काढले. भाजप उमेदवारांचे जिल्हा बँकेतील अर्ज बाद करताना खालच्या थराचे राजकारण झाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
शेतकऱ्यांच्या मोर्चाबद्दल भूमिका मांडताना आमदार गिरीश महाजनांनी पुढे सांगितले की , आधीची दीड पावणे दोन वर्षे कोरोनामध्ये गेली आहेत . लोकांना दवाखान्यासाठी खर्च लागला . रोजगार बंद होता. त्यातच . यंदाचा खरीप हंगाम हातातून गेला आहे . अतिवृष्टीने कापूस , सोयाबीन , मका , हायब्रीड सगळे गेले. . . गतवर्षी वादळात केळी , फळबागांचे नुकसान झाले. सरकारने पंचनामे केले पण १ रुपयाही भरपाई मिळाली नाही . १०० टक्के लोकांचे नुकसान झाले . मदत फक्त जाहीर केली. प्रत्यक्षात काहीच नाही. यंदाची दिवाळी शेतकऱ्यांची काळी दिवाळी आहे . या आस्मानी संकटानंतर आता वीज बिल वसुलीचे सुलतानी संकट आले आहे . शेतकऱ्यांना वीज पुरवठ्याचे ट्रान्सफार्मर्स मिळत नाहीत. १ महिना त्यासाठी लागून जातो. राज्यात शेतीच्या वीज पुरवठ्याची वाईट परिस्थिती आहे. असे असूनही आता वीज बिल वसुलीची सक्ती आली आहे . गेल्या ३ महिन्यात विहिरींवरच्या मोटारी चालूच झाल्या नाहीत आणि सरकार वीज बिल वसुली सक्तीने करत आहे. शेतकऱ्यांच्या त्रासाचे या सरकारला काहीच देणेघेणे नाही. सरकारबद्दल जनतेत रोष आहे . त्याला या मोर्चातून आम्ही वाट करून देणार आहोत. शेतकरी , कामगार , शेतमजूर सगळेच या मोर्चात सहभागी होतील , या सरकारमध्ये कुणीच कुणाचे ऐकत नाही . आम्ही ऊर्जामंत्र्यांनी भेटलो होतो पण ते म्हणतात की किमान ८० टक्के शेतकऱ्यांनी वेळेत वीज बिल भरले तरच वीज मिळेल . हे कसे शक्य आहे ? , पुढचा रब्बी हंगामपण शेतकरी घेऊ शकत नाहीत . सरकारची भूमिका उदासीन आहे . सगळं मंत्रिमंडळ आर्यन खानसाठी बसलेलं आहे . पण शेतकऱ्यांसाठी काहीही नाही . राज्यात दुसरे काही प्रश्न नाहीत का ? , आरोग्य खात्याच्या परीक्षांचे काय झाले ? हे साधे नोकऱ्यांच्या मुलाखती घेऊ शकत नाहीत ? त्याबद्दल कुणी काहीही बोलायला तयार नाही . शेतकऱ्यांचे ट्रान्स्फार्मर सरसकट बंद करणे नियमबाह्य आहे. दोन वर्षात शेतकऱ्यांच्या भरपाईची दमडीही जिल्ह्यात मिळालेली नाही,असेही ते म्हणाले.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीबद्दल आमदार गिरीश महाजन म्हणाले की , सर्वपक्षीय पॅनलसाठी ३ बैठक झाल्या, जागावाटप झाले आणि अचानक शेवटच्या बैठकीत आम्हाला असे पॅनल होणार नसल्याचे कळले. ३ बैठक झाल्यावर काँग्रेसला भाजप जातीयवादी पक्ष असल्याचा साक्षात्कार झाला. चौथ्या बैठकीत राष्ट्रवादीलाही असेच वाटले. आम्ही गाफील राहिलो आम्ही ७ च जागा लढवणार होतो. खासदार रक्षा खडसे यांच्या अर्जावर सही माझ्यासमोर झाली होती तो फॉर्म कुठे गेला ? हे सगळे सत्तेसाठी लाचार झाले आहेत. आमची या ३ पक्षांनी फसवणूक केली आहे. नाना पाटील भाजपचे उमेदवार आहेत. नाना पाटील मुक्ताईनगरचे रहिवाशी आहेत . भुसावळच्या पतसंस्थेचे कर्ज घेतल्याने ते थकबाकीदार असल्याचा खोटा दाखला दिला गेला आहे. नाना पाटलांनी असे कर्ज घेतले असेल, तर त्यांच्या मालमत्तेवर बोजा दिसत का नाही ? असा प्रश्न आमदार गिरीश महाजन यांनी यावेळी उपस्थित केला. भुसावळच्या पतसंस्थेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते असेही ते म्हणाले.