बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
जामनेर तालुक्यातील भिलखेडा शिवारात भीतीचे वातावरण
जामनेर (प्रतिनिधी) :- जामनेर तालुक्यातील भिलखेडा येथे रविवारी ता. ८ रोजी सकाळी सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात भिलखेडा येथील शेतकरी विलास मधुकर पाटील (वय – ४५) हे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, या भागात तातडीने पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.
विलास पाटील हे शेतात कोळपणी करत असताना बांधावर चारीशेजारी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी आरडाओरडा केला असता शेजारीच शेतात त्यांचा मुलगा काम करीत होता. आवाज ऐकताच तो काठी घेऊन धावत आलेला पाहून बिबट्याने पळ काढला. या हल्ल्यात विलास पाटील यांच्या शरीरावर बिबट्याच्या नखाचे व्रण उमटले असून ते थोडक्यात बचावले.
प्राथमिक उपचारासाठी त्यांना ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील यांनी पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यास मदत केली. या वेळी पहूर येथील डॉक्टरांनी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले. वन विभागाला तीन ते चार दिवसांपूर्वी सदर बिबट्या आढळला असल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी पिंजरा लावला असता तर ही घटना टाळता आली असती. अजूनही लवकरात लवकर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.