तोंडापूर येथील घटना, बँकेच्या कॅमेऱ्यात घटना कैद
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तोंडापूर येथील आयडीबीआय बॅकेच्या आत प्रवेश करत पैसे मोजून देतो या बहाण्याने शेतकऱ्याचे २० हजार रुपयांची रोकड घेऊन चोरटा पसार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोंडापूर-फर्दापुर रस्त्यावरील विविध कार्यकारी सोसायटीच्या कॉम्प्लेक्समध्ये आयडीबीआय बँकेची शाखा आहे. गुरुवारी दि. २७ जून रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ढालसिंगीचे शेतकरी योगेश गाढवे हे पैसे काढण्यासाठी आले होते. त्यांनी ५० हजार रुपयांची रोकड काढली. यावेळी त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या अज्ञात व्यक्तीने तुमच्या नोटा फाटलेल्या असल्याने मोजुन देतो, अस म्हणत गाढवे याच्या हातातून २० हजाराचे बंडल घेतले. यानंतर ते खिशात घालून बॅकेच्या बाहेर उभ्या असलेल्या दोन साथीदारांसह दुचाकीने पळ काढला. शेतकऱ्यांने आरडाओरडा केल्याने बॅक मनेजर व कर्मचारी जमा झाले. झालेला सर्व प्रकार बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.