जळगाव एसीबीची पाचोरा येथे कारवाई
पाचोरा (प्रतिनिधी) :- पाचोरा उप विभागीय अधिकारी कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी गणेश बाबुराव लोखंडे (वय ३७, वर्ग-३) यांना आज दि. १० सप्टेंबर रोजी १५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी रंगेहात अटक करण्यात आली. तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावर असलेल्या शेतजमिनीवरील ‘पोट खराब’ क्षेत्र वहितीखाली आणण्यासाठी आणि त्याद्वारे नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई व शेती विषयक कर्ज मिळवण्यासाठी अर्ज केला होता. या कामासाठी लोखंडे यांनी १५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं हि कारवाई केली.
तक्रारदाराची पत्नी मौजे कोकडी, ता. पाचोरा येथील शेतजमिनीवर शेती करत आहे. मात्र, सातबारा उताऱ्यावर हे क्षेत्र ‘पोट खराब’ म्हणून नोंद असल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता. हे क्षेत्र वहितीखाली आणण्यासाठी त्यांनी पाचोरा उप विभागीय कार्यालयात अर्ज केला.(केसीएन)या अर्जावर कार्यवाही करण्यासाठी गणेश लोखंडे यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदाराने यापूर्वी लोखंडे यांना ५,००० रुपये रोख दिले होते. उर्वरित १०,००० रुपये दिल्यावर काम पूर्ण होईल, असे लोखंडे यांनी सांगितले होते. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ९ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (लाप्रवि), जळगाव येथे तक्रार दाखल केली.
या तक्रारीची पडताळणी केली असता, लोखंडे यांनी यापूर्वी ५ हजार रुपये स्वीकारल्याचे कबूल केले आणि उर्वरित १० हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार, आज दिनांक १० सप्टेंबर रोजी सापळा कारवाईचे आयोजन करण्यात आले.(केसीएन) सापळा कारवाई दरम्यान गणेश लोखंडे यांनी तक्रारदाराकडून मागणी केलेल्या लाचेतील उर्वरित १० हजार रुपयांचा दुसरा हप्ता स्वीकारताच, त्यांना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले.हि कारवाई पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकूर, पोलीस उप अधीक्षक यांचेसह निरीक्षक हेमंत नागरे, पोशि/भूषण पाटील, पोशि/राकेश दुसाने, पोशि/अमोल सुर्यवंशी यांनी केली आहे. या कारवाईमुळे शासकीय कामांमध्ये लाच मागणाऱ्यांवर वचक बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.