रावेर तालुक्यातील पुनखेडा येथील घटना
रावेर (प्रतिनिधी) – शेतमोजणीवरून कोर्टात दावा दाखल असलेल्या जागेत वखरणी का करतोस असा जाब विचारल्याचा राग आल्याने एकावर विळ्याने वार करून जखमी करण्यात आल्याची घटना पुनखेडा (ता रावेर) येथे घडली आहे. दोघांनी परस्परांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दगड, विटा व विळ्याने केलेल्या हाणामारीत सुभाष रामभाऊ पाटील व अमोल श्रीराम धनगर दोघे रा पुनखेडा असे जखमी झालेल्यांचे नाव आहे. पुनखेडा येथील सुभाष रामभाऊ पाटील व श्रीराम दलपत धनगर यांच्यात शेत जमिनीच्या मोजणीवरून कोर्टात दावा दाखल आहे. शुक्रवारी दुपारी श्रीराम धनगर सदर जागेत वखरणी करीत असल्याने सुभाष पाटील यांनी याबाबत धनगर यांना जाब विचारला. त्याचा राग आल्याने श्रीराम धनगर यांचा मुलगा अमोलने हातातील विळा सुभाष पाटील यांच्या डोक्यावर मारून दुखापत केली.