जिल्हा परिषदेत कृषी दिनानिमित्त विशेष व्याख्यान, लाभांचे वाटप
जळगाव (प्रतिनिधी) – शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांनी नव तंत्रज्ञानाची कास धरत शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संघर्षाच्या काळात जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या सोबत आहे. असा विश्वास जिल्हाधिकारी श्री अमन मित्तल यांनी व्यक्त केला.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी मित्तल अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीडॉ.पंकज आशिया प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी विकास अधिकारी श्री जगताप यांच्यासह इतर अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकारी म्हणाले की संघर्षाच्या काळात प्रशासन शेतकऱ्यांच्या सोबत आहे. शासनाच्या सर्वाधिक योजना या शेतकऱ्यांच्या विकासासाठी आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन नेहमीचशेतकऱ्यांसोबत राहील.शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाची कास धरत उत्पादन वाढ, आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण या बाबीवर विशेष जोर दिला पाहिजे. शेती क्षेत्रात दिवसेंदिवस अनेक अमुलाग्र बदल घडत आहेत. हे बदल आत्मसात करून शेती अधिकाधिक विकसित करण्याच्या दृष्टीने प्रशासन आणि शेतकरी यांनी हातात हात घेऊन काम करणे गरजेचे आहे.
दिवसेंदिवस विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवता येतील त्यासाठी शासनाच्या विविध योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. गट शेती ही शेतकऱ्यांच्या फायद्याची असून कोणताही किंतु परंतु मनात न ठेवता शेतकऱ्यांनी चौकटीच्या बाहेर विचार केला पाहिजे. शेतकरी आपल्या शेतात पिकवत असलेला माल प्रक्रिया करून बाजारात पोहोचल्यास शेतकऱ्यांना नक्कीच आर्थिक हातभार लागू शकतो. यासाठी लवकरच प्रक्रिया उद्योजक आणि शेतकरी यांची चर्चा घडवून आणण्याच्या दृष्टीने एका बैठकीचे आयोजन केले जाईल असा विश्वास देखील जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी यावेळी व्यक्त केला. हवामानातील बदल शेती क्षेत्राशी बदलत्या विविध बाबी शेतकऱ्यांपर्यंत वेळीच पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या मोबाईलवर घरी बसल्या ही माहिती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी मोबाईल वरच सर्व डेटा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत आहे. यासाठी विविध कंपन्या यांच्याशी चर्चा देखील सुरू असून लवकरात लवकर हा उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी मित्तल यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया आपल्या मनोगत म्हणाले की शहरीकरण कितीही मोठ्या प्रमाणावर झपाट्याने झाले तरी देखील आजही देशाचे अर्थकारण शेतीवरच अवलंबून आहे. हवामानातील बदलामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
निव्वळ शेतीवरच शेतकऱ्यांनी अवलंबून न राहता प्रक्रिया उद्योगावर भर देणे गरजेचे आहे. जळगाव जिल्ह्यात कापूस आणि केळी या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे. या दोन्ही उत्पादनांना प्रक्रिया उद्योगात फार मोठी संधी आहे. जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून बचत गटांच्या सहाय्याने शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर आणि त्याचा दुष्परिणाम ओळखून रासायनिक खतांचा वापर कमी केला पाहिजे. जळगाव जिल्ह्यात रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात. मात्र त्याचे दुष्परिणाम देखील फार मोठे आहेत. शेतकरी आणि प्रशासनाने ठरविले तर मदत होऊ शकते असा विश्वास देखील डॉक्टर आशिया यांनी यावेळी व्यक्त केला. कृषी दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात कापूस संशोधन केंद्राचे कापूस पैदासकार डॉ.गिरीश चौधरी वरिष्ठ शास्त्रज्ञ हेमंत बाहेती यांनी कापूस या विषयावर शेतकऱ्यांना यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बुलढाणा येथे झालेल्या भीषण अपघातातील मृत प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यात आली.कृषी संशोधन केंद्र ममुराबाद यांनी विकसित केलेल्या निंबोळी अर्काची विमोचन देखील यावेळी उपस्तित्यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान वाटपाचे आदेश यावेळी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत विहिरीचा लाभासाठी पात्र शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेशाचे वितरण देखील करण्यात आले जिल्हास्तरीय पीक स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला. त्यासोबतच राशी सीड्स कंपनीतर्फे शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात ममुराबाद येथील शेतकरी एन डी पाटील, व आसोदा येथील शेतकरी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मनोगत आतून शेतकऱ्यांनी शेती करताना येणाऱ्या अडीअडचणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर मांडल्या. या सर्व अडचणी सोडवण्यासाठी शासन स्तरापर्यंत पाठपुरावा करण्याची आश्वासन देखील जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिले.