जामनेर तालुक्यात फत्तेपूर येथे झाली होती चोरी
जळगांव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील फत्तेपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतातून चोरीस गेलेल्या ठिबक नळया प्रकरणाचा जळगाव एलसीबीने तपास लावला आहे. एकूण ४ लाख ५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर संशयित आरोपींना पुढील कारवाईसाठी फत्तेपुर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
फत्तेपुर येथील गट क्रमांक ३९ मधील एका शेतकऱ्याच्या शेतातून ३५ बंडल ठिबक नळया चोरीस गेल्या होत्या. या गंभीर प्रकाराचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे सोपवण्यात आला होता.(केसीएन)तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे, बोदवड रोड, जामनेर येथील शेख अस्लम शेख मेहबुब यांच्या भंगार दुकानात झडती घेण्यात आली. तेथे चोरीला गेलेल्या ठिबक नळया आढळून आल्या. तक्रारदार शेतकऱ्याने वस्तूची ओळख पटवल्यानंतर दुकानदाराने शेख जावेद शेख सुल्तान (वय ३६), इकबाल उस्मान पिंजारी (वय ३०), व आलमगीर रफीक पिंजारी (वय ३५) यांच्याकडून हा माल घेतल्याचे कबूल केले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिन्ही आरोपींना तातडीने अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात ठिबक नळयांचे ३५ बंडल रुपये १ लाख ०५ हजार किमतीचे, गुन्ह्यात वापरलेले महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन रुपये ३ लाख रुपये किमतीचे असा एकूण मुद्देमाल ४ लाख ०५ हजार जप्त करण्यात आला आहे.(केसीएन)सदर संशयित आरोपींना पुढील कारवाईसाठी फत्तेपुर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे, फत्तेपूर पो. स्टे. चे सपोनि अंकुश जाधव, एलसीबीचे पोउपनि शेखर डोमाळे, पोना रणजित जाधव, पोकॉ ईश्वर पाटील, पोकॉ राहुल महाजन यांनी यशस्वीपणे पार पाडली.