जळगाव एलसीबीच्या पथकाची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात एलसीबीच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली. यामध्ये चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास शेतातून चोरलेल्या २९ पानबुडी मोटारी काढून दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.चाळीसगावसह नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शिवारातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून पाणबुडी मोटारी चोरीस गेल्या असतील, तर त्याची ओळख पटवून त्या चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातून घेवून जाण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथून दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असतांना स्थानिक गुन्ह शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोनि शशिकांत पाटील यांनी उपनिरीक्षक शेखर डोमाळे, सफौ युवराज नाईक, महेश पाटील, भुषण शेलार, सागर पाटील, बाबासाहेब पाटील, गणेश चव्हाण, दीपक नरवाडे, संदीप पाटील, तुकाराम चव्हाण, विजय पाटील यांचे पथक रवाना केले. या पथकाने सोमनाथ उर्फ लंगड्या रघुनाथ निकम (रा. अंघारी, ता. चाळीसगाव), सुधीर नाना निकम, सम्राट रविंद्र बागुल (सर्व रा. महारवाडी, ता. चाळीसगाव) या तिघाना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या सोमनाथ उर्फ लंगड्या निकम, सुधीर निकम, सम्राट बागुल यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी सुरुवातीला चोरलेल्या ११ पाणबुडी मोटार काढून दिल्या. त्यानंतर पोलिसांनी संशयितांना ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिले. त्यांनी संशयितांची पोलीस कोठडीत कसून चौकशी केल्यानंतर चोरट्यांनी चाळीसगाव तालुक्यातील हातगाव, अंधारी, रोहीणीसह नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील शेतांमधून पाणबुडी मोटारी चोरुन त्या स्वतःच्या मालकीच्या असल्याचे सांगत त्याची विक्री केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.