जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद येथील एका शेतकऱ्याचा त्याच्या शेतातीलच विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दि. ११ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. दरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू हा दोन दिवसापूर्वी झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सचिन सुरेश नारखेडे (वय ४६, रा. विद्युत कॉलनी, जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. तो विद्युत कॉलनीत आई, पत्नी, एक मुलासह राहत होता. नशिराबाद येथे सचिन आणि त्याची पत्नी दोन्ही शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, मुलाच्या शिक्षणानिमित्त ते जळगावला राहात होते. त्यांच्या मुलाने नुकतेच बारावीची परीक्षा दिली आहे. दरम्यान दोन दिवसापूर्वी सचिन नारखेडे हे शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते.
त्यानंतर शेतातील घरातच ते राहणार होते. शनिवारी दिनांक ११ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आजूबाजूच्या लोकांना शेतातील विहिरीत वास यायला लागला. तेव्हा त्यांनी पाहिले असता सचिन नारखेडे यांचा मृतदेह दिसून आला. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सचिन नारखेडे यांचा मृतदेह विहिरीतून काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या ठिकाणी दाखल करण्यात आला. कुटुंबीयांना याची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात येऊन आक्रोश केला. याबाबत नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.