शेतातील अवशेषांपासून बायोचार, स्वच्छ ऊर्जा आणि अतिरिक्त उत्पन्न; जैन इरिगेशनच्या संवादसत्रात शाश्वत शेतीची दिशा
जळगाव ( प्रतिनिधी ) – शेतीत निर्माण होणारे पिकांचे अवशेष हा कचरा नाही तर ते एक उत्पन्नाचे मोठे साधन होऊ शकते. पर्यावरण संवर्धनासोबतच देशासाठी महत्त्वाचे असणारे कार्बन क्रेडीट त्यातून कमाविता येऊ शकतात. शेतातील जैविक कोळसा म्हणजे बायोचार होय. शाश्वत शेतीसह शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळावे, यासाठी कंपनीकडून उभारण्यात येणारा ‘जैन औद्योगिक बायोचार प्रकल्प’ देशात अग्रसेर ठरेल, असा सूर जैन हिल्स येथे झालेल्या बायोचार प्रकल्पाच्या सल्लामसलत संवादसत्रातून शुक्रवारी (ता.२१) निघाला.
जैन हिल्स येथील बडी हंडा सभागृहात झालेल्या या कार्यशाळेप्रसंगी व्यासपीठावर जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, केळी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अरुण भोसले, मुक्ताईनगर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत बाहेती, कापूस संशोधक गिरीष चौधरी, संशोधक गणेश देशमुख, शेतकरी प्रतिनिधी किशोर चौधरी, सुधाकर येवले, लता बारी उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने या कार्यशाळेच उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंचक्रोशितील शेतकरी, अभ्यासक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जैन फार्म फ्रेश फूडचे संचालक अथांग जैन यांनी ऑनलाईन संवाद साधला. प्रकल्पामागील भूमिका त्यांनी मांडली. जैन इरिगेशनचा परिचय, उद्दिष्टे, ध्येयदृष्टिकोन, शाश्वत शेतीबाबत बांधिलकी तसेच बायोचार प्रकल्पाविषयी माहिती त्यांनी दिली. ‘सार्थक करुया जन्माचे रुप पालटू वसुंधरेचे’ या श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंच्या विचारांतूनच हा प्रकल्प अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरू शकेल, अशी अपेक्षा अथांग जैन यांनी व्यक्त केली.उद्घाटनानंतर कार्यशाळेचे उद्दिष्ट आणि तांत्रिक माहिती प्रकल्प प्रमुख अतिन त्यागी यांनी दिली. त्याचप्रमाणे सृजेश गुप्ता यांनी AA1000SES व PURO.EARTH या संदर्भात सविस्तर माहिती दिली. बायोचार म्हणजे काय? ते कसे तयार होते? पर्यावरण आणि शेतकऱ्यांना उपयुक्त कसे ठरेल, त्याविषयीचे सादरीकरण अतिन त्यागी आणि डॉ. मोनिका भावसार यांनी केले. जैन इरिगेशनने औद्योगिक बायोचार प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पात आंब्याच्या कोया, मक्याचे भुट्टे, कापसाच्या काड्या यासारख्या शेती व अन्न प्रक्रिया उद्योगातील अवशेषांचा वापर करून बायोचार तयार केला जातो. यामुळे उघड्यावर कचरा जाळण्यामुळे तयार होणारे हरितगृह वायू उत्सर्जन कमी होईल. पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळेल. महाराष्ट्रात दरवर्षी तयार होणाऱ्या २१ दशलक्ष मेट्रिक टन अतिरिक्त कृषी अवशेषांपैकी १ लाख टन अवशेषांचा वापर करून सुमारे २५,००० टन बायोचार आणि ५०,००० पेक्षा अधिक कार्बन क्रेडिट्स निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.
बदलत्या हवामानावर प्रभावी उपाय – अतिन त्यागी
गेल्या दहा वर्षांत जागतिक तापमान (ग्लोबल वार्मिंग) वाढले आहे. बदलत्या हवामानामुळे दुष्काळ, पूर, नैसर्गिक आपत्त्यांनी मनुष्याला सामोरे जावे लागत आहे. ‘सार्थक करुया जन्माचे रुप पालटू वसुंधरचे’ या मोठ्याभाऊंच्या ध्येयातूनच समाजाला शाश्वत शेतीतून समृद्धी घडवून आणण्यासाठी जैन औद्योगिक बायोचार प्रकल्प प्रभावी ठरू शकते.
यानंतर या प्रकल्पाविषयी शेतकऱ्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या शंकांचे निरसन करुन घेतले. काही शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रश्नोत्तर सत्राचे संचालन करार शेती विभागाचे प्रमुख गौतम देसर्डा यांनी केले. ज्ञानेश्वर शेंड यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.अनिल ढाके यांनी आभार मानले.
मातीच्या आरोग्यासह आर्थिक सुबत्तेचा मार्ग – कुर्बान तडवी
जमीनीची सुपिकता वाढविण्यासाठी सेंद्रिय कर्बन वाढविण्यासाठी जैन इरिगेशन राबवित असलेला बायोचार प्रकल्प प्रभावी ठरु शकतो. बदलते हवामानानुसार शेतकऱ्यांसाठी शेतीतून उत्पन्नाचा स्रोत मिळेल. पर्यावरण सुधारण्यास मदत होऊन मातीची सुपिकता वाढेल. तसेच देशाला कार्बन क्रेडिटमधून उत्पन्न मिळू शकते. शेतकरी मोठा खर्च करुन शेतात खते टाकतो ती खते पिकांच्या अवशेषातून जाळून टाकतो बायोचार मुळे तसे न होता जी खतं टाकली तेच गुणधर्म शेतात बायोचार मुळे वर्षाेनुवर्ष राहतील.
जैन औद्योगिक बायोचार प्रकल्पाची शाश्वत विकासाची उद्दिष्टे
जैन औद्योगिक बायोचार प्रकल्पाचे उद्दिष्ट पर्यावरणीय शाश्वतता, आर्थिक विकास आणि स्थानिक समुदायांची प्रगती यांना संतुलितपणे प्रोत्साहन देणे आहे. कृषी अवशेष जाळणे कमी करून वायुप्रदूषण आणि त्यासंबंधित आरोग्य धोके कमी होण्यास या प्रकल्पामुळे मदत होते. तसेच बायोचारच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि पीक उत्पादन सुधारते. हा प्रकल्प अवशेष संकलन, वाहतूक, बायोचार उत्पादन आणि तो विविध कृषी उपयोगात लागू करणे अशा क्षेत्रांत रोजगार आणि उपजीविका संधी निर्माण होतात. शेतकरी व अवशेष संकलकांकडून मक्याचे भुट्टे, कापसाच्या काड्या-पऱ्हाट्या आणि इतर अवशेष योग्य दराने खरेदी करून त्याला मूल्यवर्धन केले जाईल. याशिवाय प्रकल्प शाश्वत शेतीविषयी ज्ञान व कौशल्य वाढवून समुदायाचा आत्मनिर्भरपणा, सामाजिक समानता आणि दीर्घकालीन पर्यावरणीय लाभ वाढवतो. तसेच वाढत्या ग्लोबल वार्मिगवर नियंत्रण मिळविण्यासाठी मदत करेल.
*
फोटो ओळ –
(_DSC0924a) – जैन औद्योगिक बायोचार प्रकल्पातील हितधारकांशी संवाद साधताना अतिन त्यागी.
(_DSC0883) – जैन औद्योगिक बायोचार प्रकल्पाच्या हितधारकांशी संवाद सत्राचे दीपप्रज्जवलन करुन उद्घाटन करताना कुर्बान तडवी, सोबत (डावीकडून) डॉ. अनिल ढाके, बी. डी. जडे, गौतम देसर्डा, किशोर चौधरी, गणेश देशमुख, डॉ. अरुण भोसले, हेमंत बाहेती, गिरीश चौधरी, सुधाकर येवले, डॉ. बी. के. यादव.









