चोपडा तालुक्यातील अडावद येथील घटना
चोपडा ( प्रतिनिधी) – तालुक्यातील अडावद येथे कापणी करून ठेवलेल्या मक्याच्या शेतात आग लागल्याने सुमारे एक हेक्टरवरील मका जळून खाक झाला. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २२ रोजी दुपारच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या नुकसानीचा महसूल विभागाने पंचनामा केला आहे.
येथील वटार रस्त्यावरील किशोर धोंडू पाटील यांनी १ हेक्टर २७ आर. क्षेत्रात मक्याची लागवड करण्यात आली होती. मका कापणीवर आल्याने २० रोजी मका कापून ठेवला होता. दरम्यान, २२ रोजी दुपारी अचानक शॉर्टसर्किटमुळे शेतात आग लागल्याने संपूर्ण मका जळून खाक झाला.
या शेतातून वीजतारा गेल्या असून ह्या तारा लोंबकळलेल्या असल्यानेच हा प्रकार घडल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. दरम्यान, २३ रोजी अडावदचे तलाठी विजेंद्र पाटील, कोतवाल मनोज पारधी यांनी आग लागलेल्या शेतात पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केली आहे.