सावदा पोलीस स्टेशनची कामगिरी
सावदा (प्रतिनिधी):- सावदा-फैजपूर मार्गावरील गुरुकुल इंग्लिश स्कूलजवळ असलेल्या भैरम बुवा देवस्थान परिसरातील एका शेतात सुरू असलेल्या गांजाच्या शेतीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गांजाची ९३ झाडे जप्त केली असून, याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

सावदा-फैजपूर मार्गावरील गट क्रमांक ४६३ मधील शेतात निलेश रमेश पाटील (वय ४०, रा. सावदा) यांनी गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याची गोपनीय माहिती सावदा पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, फौजदार सानप, संजय चौधरी, राजेंद्र वैदकर, निलेश बाविस्कर, सुनील शेंदाळे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज तडवी, बबन तडवी आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी बुधवारी (दि. १०) या शेतावर छापा टाकला.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत शेतातून गांजाची ९३ झाडे जप्त करण्यात आली आहेत. या झाडांचे एकूण वजन २८ किलो ५४० ग्रॅम असून त्याची बाजारपेठेत किंमत सुमारे १ लाख १४ हजार ७२ रुपये इतकी आहे.
कृषी अधिकारी राजेंद्र कोंडे, नायब तहसीलदार गणेश साळी, तलाठी रशीद तडवी आणि मुक्ताईनगर येथील फॉरेन्सिक टीमच्या सदस्यांच्या उपस्थितीत या कारवाईचा रितसर पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जात आहे. पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.









