चाळीसगाव तालुक्यातील बहाळ रथाचे येथे धुळे एसीबीची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- शेतजमिनीबाबत कोर्ट कचेऱ्यांचा त्रास होऊ द्यायचा नसेल तर १० लाख रुपये द्यावे लागतील अशी लाचेची मागणी केल्याप्रकरणी व त्यातील तडजोडीअंति ५ लाखांपैकी २ लाखांचा पहिला हप्ता लाच म्हणून स्वीकारल्याप्रकरणी खाजगी इसमाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह चाळीसगाव तालुक्यातील बहाळ रथाचे या गावचे सरपंच व लिपीकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. चाळीसगाव तालुक्यातील बहाळ रथाचे येथील तक्रारदाराची गावातील शेत जमीन ही ग्रामपंचायतीकडून हक्क दाखवून परस्पर भाड्याने देण्याची शक्यता असल्याने तक्रारदाराने दिवाणी न्यायालयाकडून कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला होता.(केसीएन)त्यानंतर सरपंच राजेंद्र मोरे यांनी तक्रारदारांना भेटून शेत जमिनीबाबत कोर्ट कचेरी या टाळायच्या असतील तर शेतजमिनीतील दीड हजार चौरस फुटाचा एक प्लॉट खरेदी करून द्यावा लागेल असे सांगितले. मात्र त्यास तक्रारदारांनी नकार दिला.
नंतर सरपंच राजेंद्र मोरे यांनी पुन्हा एकदा, त्रास होऊ द्यायचा नसेल तर १० लाख रुपयांची मागणी केली. अखेर धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदारांनी तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने तपासणी केली असता सरपंच राजेंद्र मोरे व लिपिक शांताराम बोरसे यांनी एकतर प्लॉट खरेदी करून द्या अन्यथा १० लाख रुपये द्या अशी मागणी तक्रारदाराकडे केली. तेव्हा तडजोडीअंती ५ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार धुळे विभागाने सापळा रचला.
गुरुवारी दि. २६ रोजी तक्रारदारांच्या घरी खाजगी इसम सुरेश ठेंगे हा पहिला हप्ता २ लाख रुपये लाच घेताना पथकाने रंगेहात पकडला. (केसीएन)त्यानुसार धुळे विभागाकडून सरपंच राजेंद्र मोरे, लिपिक शांताराम बोरसे, खाजगी इसम सुरेश ठेंगे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान या कारवाईमुळे चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.