जामनेर तालुक्यात शेंदूर्णीतील रथोत्सवानिमित्त आले एकत्र, शेकडो भाविकांची उपस्थिती
जामनेर (प्रतिनिधी) : खान्देशचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या शेंदुर्णी नगरीमध्ये संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांनी प्रारंभ केलेला विठ्ठल रुक्मिणी २८० वा रथोत्सव व यात्रोत्सव सोहळा शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाचे गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दिलीप खोडपे हे एकत्र आले. त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन विजयासाठी साकडे घातले.
सोन नदीच्या काठावर भव्य यात्रा सुद्धा या निमित्ताने भरत असते. सकाळी ११ वाजता रथाची ब्रम्हवृंदांच्या मंत्र घोषात संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे ८ वे गादी वारस ह. भ. प. शांताराम महाराज भगत, मंत्री गिरिश महाजन, माजी जि. प. अध्यक्ष दिलीप खोडपे सर, प्रवीण गरुड ,भाजपचे नेते संजय गरुड, सरोजिनी गरुड, गोविंद अग्रवाल, अमृत खलसे, माजी नगराध्यक्षा विजयाताई खलसे आदी मान्यवरांच्या हस्ते महापुजा व आरती करण्यात आली. सन १७४४ च्या कार्तिक शुद्ध वैकुंठ चतुर्दशीला प्रारंभ झालेल्या रथोत्सवाचा वारसा आजही भक्तिभावाने साजरा केला जातो. आज त्रिविक्रम भगवान यांच्या रथाचे मनोभावे पूजन केले, हजारो भक्तांच्या उपस्थितीत हा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
रथोत्सवाच्या निमित्ताने सोन नदीच्या काठावर भव्य यात्रा भरली असुन यात हॉटेल्स, करमणुकीचे खेळ, विविध दुकाने, सिनेमागृहे, तमाशा मंडळे आहे. यामुळे १५ दिवस मोठी यात्रा भरत असते यात लाखों रुपयांची व्यवसायात उलाढाल होत असते. शेंदुर्णीकर नोकरी व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी असणारे शेंदुर्णीकर आवर्जुन उपस्थित राहत असतात. माहेरवाशीण मुली, जावाई सुद्धा रथोत्सवाला हमखास येतात. तरी भाविकांनी या रथोत्सव व पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे ८ वेळ गादी वारस ह. भ. प. शांताराम महाराज भगत, शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक धांडे, पहुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप व ग्रामस्थ यांनी केले आहे.