जळगाव सायबर पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूक करून फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध मोहीम राबवत सायबर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने ४ दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रकरणात कांजीभाई भिकाभाई यादव (वय ४२, वेरावल, गुजरात) याला अटक झाली आहे. दि.२१ ऑगस्ट २०२४ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात तक्रारदाराला या कालावधीत मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून फसवले गेले. आरोपींनी स्वतःला मालविया, आदित्य जैन, विजय कुमार अशी नावे सांगत फोन आणि व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला. त्यांनी “Raise-Pyramid एलिट” नावाच्या काल्पनिक योजनेत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर, गुंतवणूकदारांना मिळालेल्या नफ्यापैकी २० टक्के रक्कम कथित धर्मादाय संस्थांना दान म्हणून द्यावी लागेल, असे खोटे सांगून तब्बल ५३.६५ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले. मात्र, नंतर कोणतीही रक्कम परत न करता तक्रारदारांची फसवणूक करण्यात आली.
तपासादरम्यान असे उघड झाले की, संशयित आरोपीने एक बनावट कंपनी उभारली होती आणि बँक खात्यांद्वारे मिळालेली रक्कम “देणगी” म्हणून दाखवून समाजकल्याणाच्या नावाखाली खर्च केल्याचा दावा केला. आतापर्यंत या प्रकरणात ७ संशयितांचा समावेश असून, तीन जणांना अटक झाली आहे. तसेच, बँक खात्यांचे विश्लेषण करून तक्रारदाराला ११.८३ लाख रुपये परत मिळवून देण्यात आले आहेत. कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश गोराडे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, हवालदार दिलीप चिंचोले, हरून पिंजारी अशांनी केली आहे.