नाशिकमध्ये उपचारादरम्यान झाला मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी) : शेअर्स मार्केटमध्ये सुमारे १६ लाख रुपयांची रक्कम बुडाल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या युवकाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना बुधवारी दि. २६ रोजी सातपूर परिसरात घडली होती. या घटनेत ९८ टक्के भाजलेल्या युवकाचा औषधोपचार सुरू असताना मृत्यू झाला.
रवींद्र शिवाजी कोल्हे (वय ३०) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, चांदवड तालुक्यातील विटाई येथील रहिवासी व सध्या खुटवडनगर परिसरात राहणारा रवींद्र कोल्हे याने शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती. प्रारंभी तो खासगी इन्शुरन्स कंपनीत नोकरीला होता. सध्या तो खासगी बँकेत कामाला होता. त्याने त्याला मिळत असलेले पैसे आईवडिलांना न देता शेअर्स मार्केटमध्ये गुंतवले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार कोसळत असल्याने त्यात त्याचे सुमारे १६ लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे तो आर्थिक विवंचनेत होता. उसनवार घेतलेली रक्कम कशी फेडणार? शिवाय आईवडिलांनाही फसवले असल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाल्याने त्याने पिंपळगाव बहुला गावातील ज्योती विद्यालयाच्या मोकळ्या मैदानावर जाऊन त्याच्या दुचाकीतील पेट्रोल काढून स्वतःच्या अंगावर ओतून पेटवून घेतले होते. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. घटनेप्रकरणी पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरु होते.