ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले
जळगाव (प्रतिनिधी) : वेगवेगळ्या कंपनीचे शेअर खरेदी करून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शहरातील कांचन नगरात राहणाऱ्या एकाची तब्बल ३२ लाख ९ हजार ९९९ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील कांचन नगरात मोहन रघुनाथ सपकाळे (वय ४२) हे परिवारासह राहतात. दि. २७ फेब्रुवारी ते दि. ११ एप्रिल दरम्यान एका व्हॉटसॲप क्रमांकावरून श्वेता शेट्टी आणि अमोल आठवले असे नाव सांगणाऱ्या दोघांनी सपकाळे यांच्याशी संपर्क साधला. महिलेने मोहन सपकाळे यांचा विश्वास संपादन करून वेगवेगळ्या कंपनीचे शेअर खेरदी करून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार त्यांनी के.एस.मीन या नावाचे ॲप डाऊनलोड करण्याचे सांगितले. त्यानुसार सपकाळे यांनी ॲप डाऊनलोड केले. त्या ॲपवर आभासी नफा मिळाल्याचे सांगून ३२ लाख ९ हजार ९९९ रूपये गुंतविले. दरम्यान त्यांना भरलेल्या रकमेचा कोणताही परतावा मिळाला नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शनिवारी दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्वेता शेट्टी आणि अमोल आठवले असे नाव सांगणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.