जळगाव तालुक्यातील उद्योजकाची सायबर पोलिसांकडे धाव
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरात कुसुंबा येथील एका उद्योजकाला, शेअर बाजारात भरघोस नफा मिळवून देण्याच्या आमिषाने ऑनलाइन अडीच कोटी रुपयात फसवण्यात आल्याचे उघड झाले आहे. ही घटना उघड झाल्यानंतर जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एका लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर अवघ्या एका दिवसात ५० हजार रुपयांचा नफा दाखवून विश्वास संपादन केला आणि काही दिवसांतच त्याच्याकडून २.५५ कोटी रुपये उकळले. मुर्तुजा खानभाई लोखंडवाला (४२, रा.तारा बिझनेस पार्क, कुसुंबा, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. व्हॉट्सअॅपवरून ‘क्रिस्टन’ नावाच्या व्यक्तीकडून संपर्क झाला. त्याने ‘आरयूएसएल-सी सीएम’ नावाच्या कथित शेअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. २१ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत तीन वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून त्यांना २ कोटी ५५ लाख ५० हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले. बदल्यात १५ कोटी रुपयांचा नफा झाल्याचे दाखवण्यात आले, पण रक्कम काढण्यासाठी आणखी पैसे मागितले.
लोखंडवाला यांनी या कालावधीत ५० हजार, १ लाख, ५ लाख, १० लाख, २० लाख आणि ४० लाख अशा रकमांचे १३ व्यवहार केले. हे पैसे अॅप आणि लिंकद्वारे अॅक्सिस बँक, बंधन बँक आणि आयसीआयसीआय बँकांद्वारे भरले गेले. फसवणूककर्त्यांनी सुरुवातीला विश्वास जिंकण्यासाठी १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ४९,५०० रुपयांचा नफा दाखवला आणि तो काढूही दिला. यामुळे उद्योजक यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली. वेळोवेळी मिळालेल्या रकमेवर नफा ऍपमध्ये दाखवण्यात येत होता.
लोखंडवाला यांनी १ कोटी रुपये गुंतवल्यानंतर रक्कम काढण्यासाठी साडेतीन कोटी भरावे लागतील, असे सांगण्यात आले. नंतर आणखी गुंतवणुकीचे आमिष दाखवून रक्कम २.५ कोटींवर नेली. १५ कोटी नफा दाखवला, पण काढण्यासाठी पुन्हा पैसे मागितले तेव्हा फसवणूक उघड झाली. नागरिकांनी अशा लोभाला बळी न पडता गुंतवणुकीपूर्वी तपासणी करावी, असे जळगाव सायबर विभागाचे प्रमुख निरीक्षक सतीश गोराडे यांनी आवाहन केले आहे.