जळगावात त्रिवेणी समूहाच्या वतीने आयोजन : ३ कर्तुत्ववान महिलांचा सन्मान
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरात त्रिवेणी समूहाच्या वतीने “श्रावण सरी २०२५” या उपक्रमाचे आयोजन हतनूर सांस्कृतिक हॉल, महाबळ रोड येथे करण्यात आले होते. या उपक्रमात महिलांनी मराठमोळी वेशभूषा करून मराठी गीतांवर आधारित नृत्य, गाणी सादर केली. प्रसंगी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यानंतर “श्रावण सरी २०२५” या उपक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व यशाचा झेंडा रोवणाऱ्या आदर्श महिलांचा सन्मान करण्यात आला. यात कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या सुधा काबरा, वंदना पाटील आणि दिशा ठाकूर यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यानंतर महिला भगिनींनी वैयक्तिक व विविध समूहातर्फे मराठी व पारंपरिक गीते, भावगीते सादर करून नृत्य व गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये महाराष्ट्राची परंपरा, योगासह विविध सामाजिकविषयी जनजागृती सांस्कृतिक कार्यक्रमातून दिसून आली.
“श्रावण सरी” कार्यक्रमात महिलांनी गीतांच्या तालावर ठेकाहि धरला होता. मागील तीन वर्षांप्रमाणे याही वर्षी श्रावण सरी या उपक्रमाला महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमांत ४०० महिलांनी सहभाग नोंदविला. विविध खाद्यपदार्थ, कपड्यांचे व वस्तूंचे स्टॉल यावेळी लावण्यात आले होते. कार्यक्रमात महिलांना मोठ्या प्रमाणात लकी ड्रॉ काढून बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विविध संस्थांचा हातभार लाभला. आयोजक सुरेखा राहुल पवार, वैशाली जितेंद्र बोंडे, शुभांगी पराग पाटील यांनी कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानले.