गणवेश शिवून तयार मात्र फ़ंड नसल्याने पडून, जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक चित्र
जळगाव (प्रतिनिधी) :- शासनाच्या गंभीर उदासीनतेचे चित्र समोर आले आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सहा महिन्यांपासून गणवेश नसल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची मुले रंगीत, जुने कपडे घालून येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दुसरीकडे गणवेश शिवलेले आहेत, मात्र बचत गटांना पैसे दिल्याशिवाय ते गणवेश देणार नाहीत अशी माहिती मिळाली आहे.
जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शासनातर्फे दोन गणवेश आणि बूट मोफत दिले जातात. गेल्या वर्षीपर्यंत प्रशासनाकडून शाळांना पैसे देऊन त्यांना गणवेश घ्यायला सांगत असल्याने शाळांना स्वातंत्र्य होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश मिळत होता. यावर्षी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे पहिल्या गणवेशासाठी आर्थिक विकास महामंडळ यांना कापड पाठवून दिले होते. त्यांनी ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत पहिला गणवेश वाटप केला आहे.. दुसरा गणवेश स्काऊटचा देणार असल्याने कापड गटशिक्षणाधिकारी यांना पाठवण्यात आले.
स्थानिक बचत गटांच्या मार्फत ते शिवून मुलांना वाटप करायचे होते. बचत गटांनी ते शिवून ठेवले आहेत. परंतु शिक्षण परिषदेतर्फे पैसेच मिळाले नसल्याने बचत गट गणवेश देत नाहीत. म्हणून नोव्हेंबर महिना उजाडला तरी मुलांना दुसरा गणवेश मिळालेला नाही. अमळनेर तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे ४ हजार४७५ मुले आणि ४ हजार ३५३ मुली असे एकूण ८ हजार ८२८ विद्यार्थी आहेत. त्यांना गणवेश मिळावेत यासाठी शिवणकाम लवकर सुरू होण्यासाठी स्वतः आगाऊ रक्कम दिली आहे. मात्र बचत गटांना पूर्ण रक्कम मिळत नाही तोपर्यंत गणवेश ताब्यात मिळणार नाहीत, अशी माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.