रात्रीचे भोजन करणे आणि दिनश्चर्येमध्ये अनियमीतता या गोष्टींमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. माया मुळे आपली काया खराब होते. या गोष्टींचे समाधान आपल्या आगमांमध्ये दिलेले आहे. भोजन उणोदरी, साहित्य सामग्री उणोदरी आणि कषाय उणोदरी या तपस्येचा अवलंब केला तर सगळे व्यवस्थित होईल, उणोदरीचा संकल्प आपण घ्यायला हवा असे आाहन शासन दीपक परमपुज्य सुमित मुनीजी महाराज साहेब यांनी उपस्थितांना आवाहन केले.
परमपुज्य मुनीवरांनी तपस्येचे महत्त्व व होणारे लाभ उपस्थितांना सांगितले. तपस्या केल्याने शारीरीक आणि आध्यात्मिक लाभ होतात हे अंतगढसूत्रमध्ये सांगितलेले आहेत. तपस्येमुळे अनेकांचे कसे कल्याण झाले याबाबत सोदाहरण सांगण्यात आले. जगात सर्वाधिक वयोमान (११३ वर्षे) असलेल्या व्यक्तीला त्याच्या दीर्घायुष्याबाबत विचारले असता त्याने तीन गोष्टी सांगितल्या. रक्ताला नेहमी गरम ठेवा, थंड डोके ठेवा आणि औषध न घेता उपवास किंवा पोट पूर्ण भरलेले नसावे म्हणजेच जैन धर्मात त्याल उणोदरी असे म्हटले जाते. उपवास केल्याने आध्यात्मिक व शारिरीक फायदे मिळतात. ‘कम खाना और नम जाना।’ हे तत्त्व अवलंबावे असा संदेशही त्यांनी दिला.
धार्मिक भावना वाढीस लागण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असावे. ‘अहो जिनशासन लगे मनभावन…’ भगवान महावीर स्वामी यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या तरी मनात संयम भाव जागृत होतो. त्याग, तपस्या करून आत्मविकासाकडे छोटे छोटे पाऊल उचलत गेले तरी मोक्ष प्राप्ती अथवा केवल ज्ञान प्राप्तीचे उद्दिष्ट आपल्याला साध्य करता येते. आपल्यात अहो भाव असायला हवा. आत्मविकासाच्या दिशेने आपण एक एक पाऊल पुढे जाण्याचा संकल्प करू या असे परमपुज्य ऋजुप्रज्ञजी महाराज साहेब यांनी प्रवचनातून सांगितले.