जळगाव (प्रतिनिधी) : – मनुष्याचे शरिर हे अनित्य, अपवित्र आहे. अपवित्र पदार्थांपासून शरिराची निर्मिती होते. ते शाश्वत नाही मृत्यू त्याचा अंतिम धर्म आहे. शरिर हे मल, मूत्र, रुप, क्लेश, शेष, रक्त, मांस, विर्य या असुची पदार्थांपासून तयार झाले. या देहातून जे सुद्धा उत्पन्न होते ते सुद्धा अशुद्ध अपवित्र असते तरी सुद्धा मनुष्याला शरिराचे सर्वात जास्त आकर्षण असते. त्याला वास्तविक दर्शन होत नाही. शरिर फक्त फोल शिलींग प्रमाणे काम करते. दु:ख आणि क्लेशाचे कारण शरिर आहे. कितीही महागातील महाग पदार्थ शरिरात टाका किंवा सेवन करा त्याचे मल-मूत्र होऊनच बाहेर पडते. त्यामुळे स्वादासाठी नाही तर फक्त शरिराच्या गरजेपूरतेच सेवन करा. शरिराकडे बाह्यदृष्टीने न पाहता आंतरिक भावनेतून बघा आत्मारुपी पक्षी स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आपल्याला दिसेल. आधुनिकतेच्या मागे धावत असताना चांगले काय आणि वाईट काय, त्याचा दुष्परिणाम काय याची जाणिव आपल्याला होत नाही. असे स्पष्ट विचार आज धर्मसभेत शासनदीपक प. पु. सुमितमुनिजी महाराज साहेब यांनी श्रावक-श्राविकांसमोर मांडले.
आत्मा ते महात्मा आणि महात्मा ते परमार्थ हे ध्येय पूर्ण करताना मानवता महत्त्वाची आहे. मानवता गुण नसेल तर महात्मा होता येत नाही. जीवांचे संरक्षण, दुसऱ्यांच्या दु:खांचे कारण न होता, आपल्याजवळील संपत्ती, सत्तेचा सदुपयोग केला तरच खऱ्या अर्थाने धनवान होता येते. सुख वाटल्याने सुख वाढते आणि दु:ख घटते. जो तो आपला स्वार्थ बघतोय. मुलगा वडीलांकडून, भाऊ दुसऱ्या भावाकडून, बहिण-भावाकडून, पत्नी-पती कडून प्रत्येक नाते हे स्वार्थासाठी आहे त्यात दुसऱ्यांविषयी दया, प्रेम, मानवता आली तर ते सुखाचे कारण होते. कमाविण्यासाठी दोन हात आहेत तर भोजन करण्यासाठी त्यापैकी एक हात आणि दुसरा हात देण्यासाठी पुढे करा! दोघंही हाताने सेवन करुन नका; असे विचार आरंभी परमपूज्य प.पु. भूतीप्रज्ञमुनिजी म.सा. यांनी मांडले.