तळोदा (प्रतिनिधी) – शरीर ही मौल्यवान संपत्ती असून शारीरिक सदृढतेकडे साऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.शरीर सदृढ राहिले तर सर्व व्याधी व समस्यांवर मात करू शकतो,असे प्रतिपादन शरीरसौष्ठवपटू महाराष्ट्र श्री किशोर डांगे यांनी केले.
तळोदा येथिल आदित्य जीमच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त तळोदा येथे फिटनेस मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेश पाडवी,नगराध्यक्ष अजय परदेशी,भाजपा ओबीसी सेलचे विश्वनाथ कलाल,भाजपा तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी,अनुसूचित जाती आघाडीचे डॉ स्वप्निल बैसाणे,पोलिस उपनिरीक्षक अभय मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डांगे यांनी सांगितले की,तळोदा सारख्या शहरातून देखिल शरीरसौष्ठवपटू घडले पाहिजे.प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशासाठी सुवर्णपदक पटकावले.त्यासाठी मला अनेक मान्यवरांचे पाठबळ मिळाले.त्यामुळे सामान्य कुटुंबातील तरुनणाना योग्य मदत व मार्गदर्शन मिळाले तर देखील या क्षेत्रात नाव कमवू शकतात.त्यामुळे या क्षेत्राकडे गांभीर्याने बघण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विश्वनाथ कलाल यांनी देखिल मनोगत व्यक्त केले व उपस्थितांना व्यायामाचे महत्त्व सांगितले.याप्रसंगी लकी ड्राचे विजेते घोषित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश मराठे यांनी केले तर आभार आदित्य मालपुरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदित्य जिमचे शुभम कर्णकार,विवेक महाले,विकास जाधव,गणेश सोलंकी,मयूर महाले,पुष्पेंद्र मराठे,निलेश जावरे, आदींसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

शरीरसौष्ठवपटू घडविण्यासाठी तळोदा दत्तक
सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या तळोदा सारख्या आदिवासी बहुल भागातील शहरातून शरीरसौष्ठवपटू घडावेत यासाठी युवकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी तळोदा शहर दत्तक घेत असल्याची घोषणा शरीरसौष्ठवपटू किशोर डांगे यांनी याप्रसंगी केली. व्यायाम संदर्भात व शरीरसौष्ठव बाबतीत कोणताही मार्गदर्शनासाठी युवकांना कधीही मदत करण्यास तयार असून यामुळे युवकांसाठी विनामूल्य वेबिनार घेणार येणार असल्याची माहिती किशोर डांगे यांनी बोलताना दिली.







