नाशिक (वृत्तसंस्था) – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अमाप अपसंपदा असून यातून त्यांनी मुंबईत नऊ मजली इमारत उभारल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी भुजबळांच्या संपत्तीची माहिती द्यावी असे आव्हान देखील त्यांनी येथील पत्रकार परिषदेत केले.

किरीट सोमय्या यांनी आज नाशिक येथील पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईत नऊ मजली इमारत बांधली आहे. या इमारतीत संपूर्ण भुजबळ कुटुंब राहत आहे. मात्र, कागदावर परवेज कन्स्ट्रक्सशनची मालकी दाखवली आहे. त्यामुळे भुजबळांनी या परवेजशी आणि इमारतीशी काय संबंध आहे हे स्पष्ट करावं, या परवेजला भुजबळ राहण्याचं भाडं देतात का? की त्यांच्याकडून ही इमारत विकत घेतली आहे, याचा खुलासाही भुजबळ यांनी करावा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली. तसेच येत्या शनिवारी या इमारतीची पाहणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.







