नाशिक ( प्रतिनिधी ) – शिवरायांचे राज्य भोसल्यांचे नव्हे, तर रयतेचे हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखले जाते अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी नक्षली असू शकत नाही , असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले. इगतपुरी तालुक्यातील सोनोशी गावात क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मरणार्थ आयोजित सन्मान बाडगीच्या माचीचा या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, मंत्री जितेंद्र आव्हाड, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, पिढ्यान पिढ्या या देशाचा मूळ मालक असलेल्यांची अवस्था वाईट आहे. त्यांच्या परिस्थितीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. राघोजी भांगरे यांचे स्मरक उभारतो आहोत. आदिवासी समाजाची तरुण पिढी इथे आली याचा आनंद आहे. आदिवासींसाठी संघर्ष करावा लागेल. खरे तर अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी नक्षली असू शकत नाही. पुढच्या आठवड्यात नक्षली भागात मी स्वतः जाणार आहे. तिथल्या तरुणांशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवरायांच्या राज्याला भोसल्यांचे राज्य असे कुणी केले किंवा म्हणाले नाही. ते रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्याचे राज्य असे म्हटले जाते. भीमा कोरेगावला ऐतिहासिक घटना घडली, पण त्याचा देशात वाद झाला. पण तिथे लढणारा व्यक्ती आदिवासी होता. बिरसा यांचा वारसा जपला पाहिजे. आदिवासी संस्कृती जपली पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, वनवासी आश्रमच्या निमित्ताने चांगले काम चालू आहे, असे चित्र तयार केले जात आहे. मात्र, आदिवासी या देशाचे मूळ मालक आहेत. त्या आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न होतो आहे. मुंबईत कंटाळलेले लोक इथे जमिनी घेऊन आदिवासींना कामाला ठेवताहेत. आरक्षण काढण्यासाठीच काही लोक तुम्हाला वनवासी म्हणत आहेत, असा दावा त्यांनी केली.
कार्यक्रमात पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, पवार साहेबांनी नेहमी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न केले. आजूबाजूची जागा डिफेन्ससाठी संपादित करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी पवार साहेबांनी आदिवासींच्या पाठीशी उभे राहून मदत केली. काही लोक म्हणतात 1947 ला मिळालेले स्वतंत्र म्हणजे भीक आहे. 2014 नंतर काय मिळाले. पेट्रोल महाग, गॅस महाग. ज्यांना देशाचा इतिहास माहित नाही त्यांना पुरस्कार दिला, असा टोलाही त्यांनी हाणला.