जळगाव ( प्रतिनिधी ) – दंगल झाली की पोलिसांना शांतता समितीची आठवण होते. इतर वेळी मात्र पोलीस स्टेशनला शांतता समितीचे सदस्य उभे राहतात आणि दोन नंबर धंदेवाले खुर्चीवर आदराने बसविले जातात अशी खंत व्यक्त करीत आज आमदार राजूमामा भोळे यांनी जळगाव येथे शांतता कमिटी बैठकीत पोलिसांची शिकवणी घेतली.
मालेगाव, अमरावती, नांदेड येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथे अनुचित प्रकार घडू नये यासाठी शांतता समिती बैठक झाली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे तसेच आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार भोळे यांनी शांतता समिती सदस्यांचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले केवळ अशांतता निर्माण झाली म्हणून या सदस्यांना बोलाविले जाते. त्यांना मान दिला जातो. हे कायम झाले पाहिजे. इतर वेळी मात्र शांतता समिती सदस्य पोलीस स्टेशनला उभे राहतात आणि पोलीस दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना आदराने खुर्चीवर बसवतात, हे चित्र बरोबर नाही. सदस्यांना आदराने वागवावे असे आदेश प्रत्येक पोलीस स्टेशनला दिले जावे. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी जिल्ह्यात शांतता कायम रहावी यासाठी सदस्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले.