भुसावळ येथील तरुणाचा शालकानेच केला खून, तपासात निष्पन्न
बाजारपेठ पोलिसांचा यशस्वी तपास
भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार निखील राजपूत याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे फिरवीत संशयित आरोपीला अटक केली आहे. हा संशयित मयत निखिल याचा सख्खा शालक असून त्याने कौटुंबिक वादातून खून केल्याचे निष्पन्न होत आहे.
पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार म्हणून निखील राजपूतची ख्याती होती. शिवाय यापूर्वी त्याच्यावर हद्दपारीची कारवाईदेखील करण्यात आली होती. पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यासह धमकी देणे, खंडणी वसुल करणे, मारहाण करणे यासह गंभीर गुन्ह्यात निखील राजपूत हा प्रमुख संशयित आरोपी होती. शहरातील श्रीराम नगराजवळील पाण्याच्या टाकीजवळ त्याचे वास्तव्य होते. शुक्रवारी रात्री निखील हा घरी आल्यानंतर काही संशयितासोबत पाण्याच्या टाकीच्या टेरेसवर झोपला असता त्याचा वाद झाला. वादातून त्याच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार करीत खून करण्यात आल्याची घटना समोर आली. एका संशयिताचे नाव निष्पन्न झाले असून कौटूंबिक वादातून त्याने हा खून केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता मारेकरी हा निखील राजपूतच्या चांगल्या परिचयाचा व्यक्ती असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. निखील हा पाण्याच्या टाकीवर झोपत असल्याची माहिती त्याला असल्याने त्याने टाकीवर चढून निखीलवर वार केले. याप्रसंगी निखीलसोबत काही जण देखील होते. मात्र त्यांना काही कळण्याच्या आतच मारेकर्याने पलायन केले. पोलिसांनी तपास केला असता सदर आरोपी हा निलेश चंद्रकांत ठाकूर ( वय २२, रा. कंडारी, ता. भुसावळ) असल्याची माहिती मिळाली. त्याला बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने शिताफीने अटक केली.
मयत निखीलने आधी समाजातील तरूणीशी विवाह केला होता. तिला घटस्फोट दिल्यानंतर त्याने आंतरजातीय विवाह केला होता. तो आपल्या पत्नीला त्रास देत असे. त्याचे काही महिलांशी विवाहबाह्य संबंध देखील असल्याची माहिती समोर येत आहे. यातून अनेकदा वाद देखील झाले होते. याच वादातून शालकाने थेट आपल्या मेहुण्याचाच गेम केला. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.