ग्रामीण भागात वाहतुकीबाबत मोठी गैरसोय
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- शहरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. मात्र जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर जाणाऱ्या जलद बसेस या बस स्टॉपवर थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या.
आज शुक्रवारी दि. ८ ऑगस्ट रोजी आ. चव्हाण हे खरजई नाका येथून जळगावकडे प्रवास करत असताना तेथे थांबलेल्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना हात दिला व त्यांनी सांगितले की, इथे जलद बस थांबत नसल्यामुळे आम्हाला तासंतास वाट बघावी लागते. त्यावर आ. मंगेश चव्हाण यांनी तात्काळ चाळीसगाव आगार प्रमुख यांच्याशी संपर्क साधून जलद बसेस थांबा देण्याबाबत तात्काळ कारवाई करण्याची सूचना केली. विद्यार्थी मित्रांच्या भावना जाणून घेत त्यांना देखील सदर बाबतीत निश्चिंत राहण्याचे आश्वस्त केले. तसेच लगेच तेथून जाणारी बस थांबवत सदर विद्यार्थ्यांची जाण्याची सोय करून दिली.