मुक्ताईनगर शहरातील विद्यालयात घडली घटना
मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – शहरातील जे.ई. स्कूलमध्ये सातवीत शिकत असलेल्या एका १३ वर्षीय विद्यार्थ्याचा आज बुधवार दि. ३० जुलै रोजी दुपारच्या सुमारास अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही बातमी कळताच मुलाच्या पालकांनी शाळेत एकच आक्रोश केला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
चैतन्य शंकर मराठे (वय १३, रा. मुंढोळदे, ता. मुक्ताईनगर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. चैतन्य आई-वडील आणि मोठ्या भावासोबत मुंढोळदे येथे राहत होता. मुक्ताईनगर शहरातील जे.ई. स्कूलमध्ये सातवीच्या वर्गात शिकत होता. नेहमीप्रमाणे आज सकाळी तो शाळेच्या बसने शाळेत आला होता. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीमध्ये चैतन्यने जेवण केले आणि त्यानंतर तो मित्रांसोबत खेळत होता. थोड्या वेळाने त्याने पाणी प्यायले आणि बाकावर बसला. बाकावर बसल्यानंतर काही क्षणातच त्याची प्रकृती खालावली आणि त्याचा अचानक मृत्यू झाला.
ही घटना शाळेतील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच मुख्याध्यापकांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.चैतन्यच्या मृत्यूची बातमी कळताच त्याचे नातेवाईक आणि कुटुंबीय शाळेत पोहोचले. आपल्या मुलाला मृत अवस्थेत पाहून त्यांनी अक्षरशः हंबरडा फोडला. या घटनेमुळे शाळेत आणि गावात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे.