शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची माहिती
मुंबई (वृत्तसेवा) : स्वयंअर्थसहाय्य तत्वावर मान्यताप्राप्त वर्ग इयत्ता ६ वी ते १२ वी दर्जावाढ व वर्ग इयत्ता १ ली ते १२ वीच्या नवीन मंजुरीच्या प्रकरणी शासन सकारात्मक असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.
अर्धातास चर्चेदरम्यान सदस्य जयंत असगावकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री भुसे बोलत होते. शाळांकडून केली जाणारी शुल्क आकारणी आणि पालकांकडून घेतले जाणारे शुल्क याविषयी चर्चा होण्याची आवश्यकता व्यक्त करून भुसे म्हणाले की, शाळांसाठीच्या निकषांची ज्याप्रमाणे चर्चा होते तशाच प्रकारे या विषयांची चर्चा झाली पाहिजे. राज्यात राज्य मंडळ १३ हजार ६६४, सीबीएससीच्या १ हजार २०४ राज्य मंडळ व सीबीएससी १५ अशा पद्धतीने एकूण १५ हजार २६१ शाळाना परवानगी देण्यात आलेली आहे. या संदर्भामध्ये ऑनलाइन प्रक्रियेचाही विचार करण्यात येत आहे. आतापर्यंत साधारणतः दर्जावाढचे १३४ आणि नवीन शाळेचे ८१ असे ऑनलाईन प्रस्ताव प्राप्त आहेत तर ऑफलाइनचे १२७ प्रस्ताव प्राप्त असल्याची माहितीही भुसे यांनी दिली.