अन्न व औषध प्रशासन, जळगाव शहर पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातून गुटखा घेऊन जाणाऱ्या एका वाहनावर पोलिसांनी व अन्न व औषध प्रशासनाने थेट कारवाई केली. यात १२ लाख ५५ हजार ८२० रुपयांचा गुटखा व ४ लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले. ही कारवाई दि. २९ ऑगस्ट रोजी कोंबडी बाजारजवळ करण्यात आली. या प्रकरणी बिहार व नशिराबाद येथील दोन जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातून एका वाहनामधून गुटखा नेला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच शहर पोलिसांनी सापळा रचला. मालवाहू वाहन कोंबडी बाजार परिसरात अडविले असता त्यात वेगवेगळ्या प्रकारचा प्रतिबंधीत पानमसाला, सुगंधित तंबाखू असा एकूण १२ लाख ५५ हजार ८२० रुपयांचा साठा तसेच चार लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण १६ लाख ५५ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंके यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पप्पूकुमार शिवदुलार सहनी (२७, रा. गंगासारा, बिहार) व सुरेशकुमार कुंदन सहानी (२७, रा. नशिराबाद, ता. जळगाव) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.