मुंबई ( प्रतिनिधी ) – शहरातील रस्त्यांच्या कामासाठी सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत ४२ कोटी रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. प्रमुख रस्त्यांची कामे करताना गुणवत्तेवर भर देण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत जळगाव शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या रस्ते विकास प्रकल्पाचा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आयोजित बैठकीत आढावा घेतला. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास प्रधान सचिव महेश पाठक, पाणीपुरवठा व स्वच्छता प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांचेसह दूरदृश्य प्रणालीद्वारे महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम अधिक्षक अभियंता उपस्थित होते.
शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. नागरिकांची गैरसोय होत असून मुख्य रस्त्यांची कामे तातडीने सुरू करणे गरजेचे आहे, तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना नगरविकासमंत्री शिंदे यांनी दिल्या. रस्त्यांची कामे सूचविण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या. या समितीमध्ये जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांचा समावेश असेल. रस्त्यांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करणार आहे
सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत मंजूर १०० कोटी रुपयांपैकी उर्वरित ५८ कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी पालकमंत्री पाटील यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली महापालिकेने निधी मागणीचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर करण्याचे निर्देश नगरविकासमंत्र्यांनी दिले.