कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
अमळनेर ( प्रतिनिधी ) – शेतकऱ्यांची खतासाठी अडवणूक करणाऱ्या तालुक्यातील सहा कृषी केंद्रांचा खत विक्री परवाना २१ दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. जिल्हा कृषी विभागाच्या भरारी पथकाने ही धडक कारवाई केली आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच तालुक्यातील काही कृषी केंद्र चालकांकडून युरियासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात येत होती. साठा असूनही ही कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने युरिया विक्री करून त्यासोबत इतर कृषी निविष्ठा बळजबरीने शेतकऱ्यांना खरेदी कराव्या लागत होत्या. याबाबत जिल्हा स्तरावर तक्रारी गेल्याने जिल्हास्तरीय भरती पथकाचे प्रमुख पद्मनाभ म्हस्के यांनी २९ जून रोजी अचानक भेटी देऊन काही कृषी केंद्रांची तपासणी केली होती. तसेच काही दुकानांवर डमी ग्राहक पाठवून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचे दिसून आले होते.
शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या सहा कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली असून सक्षम परवाना अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी यांनी दिलेल्या सुनावणी नुसार तिरुपती ट्रेडर्स, गायत्री फर्टिलायझर, धरतीधन, शहा एजन्सी, वर्धमान स्टोअर्स, संजय कृषी केंद्र या सहा कृषी केंद्रांचा खत परवाना २१ दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. ३१ जुलै ते २० ऑगस्ट या निलंबन काळात सदर कृषी केंद्र खत विक्री करू शकत नाही. दरम्यान २९ जुलै रोजी झालेल्या भरारी पथकाने तपासणी केलेल्या एल एम कवाड व साईकृष्णा फर्टिलायझर या कृषी केंद्रातील युरिया साठ्यात अनियमितता आढळून आल्याची माहिती भरारी पथक प्रमुख पद्मनाभ म्हस्के यांनी दिली होती. त्यामुळे या दोन कृषी केंद्रावर ही कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.