पाचोरा रेल्वे स्टेशन परिसरातील घटना : गोंदलेल्या चित्रावरुन मयताची पटली ओळख
पाचोरा (प्रतिनिधी) :- येथील रेल्वे स्टेशन हद्दीत सेवाग्राम एक्स्प्रेसखाली ३२ वर्षीय तरुण आल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना पाचोरा रेल्वे स्टेशन परिसरात शनिवार २८ रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
सागर उर्फ विकी राजू जोगळे (वय-३२, रा. पाचोरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. शनिवार, २८ रोजी पाचोरा रेल्वे स्टेशन किमी नं. ३७१/१ ते ३ दरम्यान डाउन लाईनवर ट्रेन नं. १२१३९ डाउन सेवाग्राम एक्स्प्रेस गाडी खाली ३२ वर्षीय तरुण आल्याने त्याच्या डोक्यास जबर मार लागला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. सेवाग्राम एक्स्प्रेसचे लोको पायलट यांनी पाचोरा रेल्वे स्टेशनचे उपस्टेशन प्रबंधक यांना ही खबर दिली.
उप स्टेशन प्रबंधक यांनी या घटनेची माहिती पाचोरा दुरक्षेत्र रेल्वे पोलिसांना दिली. एएसआय रामराव इंगळे, आरपीएफ सागर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविला. घटने प्रकरणी आधी मयताची अनोळखी म्हणून नोंद करण्यात आली होती. मयताच्या उजव्या हाताच्या दंडावर बुद्धाचे व छातीवर भीम रत्न असे गोंदलेले चित्र आढळून आल्याने या चित्रांवरून मयताची ओळख पटली.
शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या देण्यात आला. रविवारी दुपारी मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तपास एएसआय रामराव इंगळे हे करीत आहे.