जळगाव (प्रतिनिधी) – येथील पिप्राळा परिसरातील महानगरपालिकेचा प्रभाग १० मधील ३ नगरसेवकांनी भाजपात घरवापसी केली आहे. शुक्रवारी विभागीय आयुक्तांनी २७ नगरसेवकांना अपात्रतेबाबत नोटीस दिल्यानंतर शनिवारी ९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी या तीन नगरसेवकांनी केलेली घरवापसी चर्चेचा विषय ठरली आहे. अजिंठा विश्रामगृह येथे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत तिन्ही नगरसेवकांनी पुन्हा प्रवेश केला. यावेळी आ. सुरेश भोळे, भाजप शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गटनेते भगत बालाणी, सभापती राजेंद्र घुगे पाटील, नगरसेवक अश्विन सोनवणे, कैलास सोनवणे, डॉ. राधेशाम चौधरी उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेने भाजपाची सुरुवातील २७ नगरसेवक फोडून महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर प्रभाग क्रमांक १० मधील ३ नगरसेवक सुरेश सोनवणे, शोभा बारी, हसीनाबी शेख शरीफ यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश करीत बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या गळाला भाजपाचे ५७ पैकी ३० नगरसेवक लागले होते.

शुक्रवारी विभागीय आयुक्तांनी २७ बंडखोरांना भाजपने दाखल केलेल्या याचिकेचा विचार करून अपात्रतेची नोटिसा बजावलेल्या आहेत. भाजपने, दुसऱ्या टप्प्यात शिवसेनेत गेलेले बंडखोर नगरसेवक सुरेश सोनवणे, शोभा बारी, हसीनाबी शेख शरीफ यांच्याविरोधात कुठलीही याचिका वा तक्रार केलेली नव्हती. २७ नगरसेवकांना मिळालेली नोटीस पाहता तिन्ही नगरसेवकांनी भाजपात तत्काळ घरवापसी केली. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी, पुष्पगुच्छ देऊन तीनही नगरसेवकांचा सत्कार केला. याबाबत सुरेश सोनवणे यांनी पत्रकारांना माहिती दिली. त्यात त्यांनी, सुरुवातीपासूनच भाजपात होतो. कधीही पक्ष सोडला नाही, आमचे गटनेते भगत बालाणी आहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे.







