अमळनेर येथील घटना, नाशिकच्या चौघांवर गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) :- प्रादेशिक सेनेमध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून तालुक्यातील ९ पेक्षा जास्त तरुणांना नाशिक येथील चौघांनी फसवणूक केल्याची घटना जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२३ दरम्यान घडली. एकाने चौघांविरुद्ध साडेतीन लाखात फसवणूक केल्याचा गुन्हा अमळनेर पोलिसात दाखल केला आहे.
जानेवारी २०२२ मध्ये एका करियर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी समाधान सुखदेव पाटील हा तरुण देखील तेथे गेला होता. त्याला विलास धर्माजी पांडव, सुलोचना विलास पांडव, दीपक विलास पांडव व सचिन मधुकर केदारे (सर्व रा साईराम रो हौसेस, कालिंका पार्क, उंटवाडी, त्रिमूर्ती चौक नाशिक) हे भेटले. त्यावेळी विलास पांडव यांनी त्याला प्रादेशिक सेनेमध्ये भरती होण्याचा सल्ला दिला. त्यासाठी नाशिक येथे सहा महिन्यांचा निवासी प्रशिक्षण व मार्गदर्शन कोर्स करावा लागतो. खाण्यापिण्यासह सर्व खर्च चार लाख रुपये आहे. मात्र एकरकमी रक्कम दिल्यास ५० हजाराची सूट दिली जाईल असा विश्वास दिला. समाधान याने त्याच्या आईला याबाबत विचारणा केली. तिच्या होकारानंतर त्याने विलासला कळवले.
विलासने आणखी काही बेरोजगार मित्रांना सांग म्हणून सांगितले. म्हणून समाधान याने त्याचे मित्र ज्ञानेश्वर सुखदेव माळी, मंगेश संतोष पाटील, निखिल रवींद्र पाटील, जयेश ज्ञानेश्वर जाधव, दीपक ज्ञानेश्वर पाटील, प्रवीण सुरेश पाटील, उमेश मुरलीधर चव्हाण, मनोज सुरेश पाटील याना सांगितले व त्यांनीही त्यांच्या परिस्थितीनुसार पैसे दिले. विलास पांडव याने तरुणांना खात्री पटावी म्हणून महार रेजिमेंट, सागर मध्यप्रदेश येथे बोलावून घेतले. तेथील मार्गदर्शन केलेल्या उमेदवारांना वेगवेगळ्या पदावर नोकरी मिळाली म्हणून भासवले. तसेच मुलगा दीपक सैन्यदलात उच्च पदावर नोकरीस आहे असा विश्वास संपादन केला.
म्हणून विलास व त्याचा भाचा सचिन केदारे यांच्या फोन पे वर खात्यावर साडे तीन लाख रुपये टाकले. मात्र अनेक महिने उलटून गेल्यावरही आम्हाला प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले नाही. लवकरच प्रशिक्षण सुरू होईल असे प्रत्येकवेळी सांगितले गेले. अखेरीस १४ एप्रिल २०२३ रोजी समाधान व त्याचा मित्र नाशिक येथे त्यांच्या घरी गेले असता विलास याने तुम्हाला प्रशिक्षण देणार नाही तसेच तुमचे पैसे परत करणार नाही. तुम्ही आमच्याकडे पैसे मागितले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही. आणि सुलोचना हिने, जर पैसे मागायला आले तर तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली. अखेरीस समाधान याने उशीरा अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहेत.