मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यातल्या जनतेला वाढीव वीज बिलाचा सामना करावा लागत आहे. मुंबईसह राज्यभरातून याविषयी ओरड होत आहे. लॉकडाउनच्या काळात संपूर्ण व्यवहारांना बंदी असल्यानं वीजबिलं पाठवण्यात आली नव्हती. जूननंतर वीजबिलं देण्यास सुरूवात झाली असून, वीजबिलाची रक्कम बघून अनेकांना शॉक बसला आहे. या मुद्यावर सर्वसामान्यांपासून चित्रपट सृष्टीतील कलाकारांनीही आवाज उठवला होता. याच वीजबिलाच्या मुद्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच सरकारचं लक्ष वेधलं आहे.
या प्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. “राज्य सरकारनं महावितरण आणि बेस्ट सारख्या सरकारी आस्थापनांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज द्यायला हवी, अन्यथा या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल,” असा इशारा राज ठाकरे यांनी पत्रातून दिला आहे.







