जयवर्धन नेवे यांची भावना ; शिवचरित्रकार दादा नेवेंनी ७० व्या वर्षी जिंकली कोरोनाची लढाई
जळगाव ;- संकट आलं की माणूस देवाचा धावा करतो. देवाचा शोध घेऊ लागतो. कोरोनाच्या या संकटकाळात प्रत्येक माणसाची आज तशीच परिस्थीती झाली आहे. मात्र कोरोनाच्या या संकटकाळात खरा देव डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील डॉक्टरांमध्येच सापडत असल्याची भावना जयवर्धन नेवे यांनी आज व्यक्त केली.
शिवचरित्रकार तथा समाजसेवक दादासाहेब (दुर्गादास) नेवे यांना कोरोनाची लागण झाली होती. श्री. नेवे यांना आधीच पार्किन्सनचा त्रास होता. मात्र छत्रपती शिवरायांवर अगाढ श्रध्दा असल्याने लढाई कुठलीही असो लढण्याचा बाणा हा त्यांच्या अंगातच पुर्वीपासून आहे. कोरोनाची बाधा झाल्यानंतर नेवे कुटूंबियांसमोर मोठा प्रश्न उभा राहीला होता. त्यांनी तातडीने माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्याशी संपर्क साधुन दादासाहेब नेवे यांना कोरोनावरील उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. याठिकाणी डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. चंद्रय्या कांते, डॉ. पाराजी बाचेवार, वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, रूग्णालयाचे प्रशासन अधिकारी आशिष भिरूड,प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ डॉक्टरांच्या टीमने दादासाहेब नेवे यांच्या उपचार सुरू केले. पार्कीन्सनचा त्रास असला तरी लढाऊ वृत्तीमुळे श्री. नेवे यांनी कोरोनाशी दोन हात करायला सुरवात केली. अवघ्या आठच दिवसात दादासाहेब नेवे यांनी कोरोनाची ही लढाई जिंकली. आज श्री. नेवे यांना रूग्णालयातुन सुटी देण्यात आली. यावेळी नेवे कुटूंबियांच्या चेहर्यावर मनमुराद आनंद दिसून आला.
काय म्हणाले जयवर्धन नेवे….
दादासाहेब नेवे कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव जयवर्धन नेवे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, माणूस देवाचा शोध घेतो. मात्र खरा देव हा डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील डॉक्टरांमध्येच मला दिसला. या रूग्णालयातील आरोग्याची सुविधा अति उत्तम असुन बोट ठेवायला सुध्दा जागा नाही. याठिकाणी स्वच्छता, साफसफाई, नास्त्यासह जेवणाची गुणवत्ता, काढा, योग प्राणायाम यासोबतच डॉक्टरांच्या दिवभरातून चार ते पाच वेळा होणार्या व्हिजीट या निश्चीत डॉ. उल्हास पाटील रूग्णालयच्या जमेच्या बाजू आहेत. माझी आई देवयानी नेवे ही स्वत: आठ दिवस दादांजवळ बसून होती. रूग्णालयातील डॉक्टर, नर्स, स्टाफ आणि कर्मचारी हे वेळोवेळी प्रत्येक रूग्णाचा उत्साह आणि आत्मविश्वास हा वाढवुन ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच दादांसह अनेक रूग्ण कोरोनाची लढाई जिंकत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.