जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील मासूमवाडीजवळच्या सय्यदनगरात सोमवारी रात्री झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने चोरीची कबुली दिली आहे त्याला न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या आरोपीला मंगळवारी रात्रीच ताब्यात घेतले होते हा घरफोडीचा गुन्हा तात्काळ उघडकीस आला असून आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येतील असे पोलिसांनी सांगितले . प्लॉटिंग ब्रोकरचा व्यवसाय करणारे फिर्यादी शेख सलीम शेख रशीद यांच्या सय्यदनगरातील घरात चोरी झाली होती चोरट्यांनी घरातील २५ हजार रुपये रोख रकमेसह ७ हजारांचे २ मोबाइल , २३ हजारांच्या चांदीच्या १२ अंगठ्या व पेंडल , ५०० रुपयांचे पितळी भांडे असा ५५ हजारांचा ऐवज लंपास केला होता .
पो नि प्रताप शिकारे यांना खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही चोरी सराईत गुन्हेगार वसीम कबीर पटेल ( वय २२ , नशेमन कॉलनी ) याने केल्याचे समजले होते . सहाय्यक फौजदार अतुल वंजारी , पो हे कॉ रामकृष्ण पाटील , पो ना इम्रान सय्यद , योगेश बारी , सचिन पाटील , किशोर पाटील , मुकेश पाटील यांच्या पथकाने पुढे तपास करून या आरोपीला अटक केली . त्याने चोरीची कबुली दिल्यावर पोलिसांनी त्याच्याकडून या चोरीतील ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे . या आरोपीच्या विरोधात या पूर्वीही चोरीचे ४ गुन्हे दाखल आहेत.