जळगावात धाडसी घरफोडी फसली
जळगाव (प्रतिनिधी) : – चोरीच्या दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी सराफ कारागिराच्या घराचा कडीकोयंडा तुटण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजाला बसविलेले सायरन वाजल्यामुळे मालकासह परिसरातील नागरिक जागे झाल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला आणि चोरटे दुचाकी सोडून पसार झाले. ही घटना शनिवारी पहाटे साडेतीन वाजता सराफ बाजारातील मारवाडी व्यायाम शाळेजवळ घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
शहरातील सराफ बाजार परिसरातील मारवाडी व्यायामशाळेजवळ अनिल इंगळे यांचे पद्मावती गोल्ड नावाचे सोने चांदीचे दागिने तयार घडविण्याचे दुकान आहे. शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास काळ्या रंगाचे कपडे आणि डोक्यात टोपी घातलेले चार चोरटे त्यांच्या घराजवळ आले. त्यांनी घराच्या बाहेरील बाजूला लावलेली लोखंडी अँगल कापले. त्यानंतर घराचा मुख्यदरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजाला लावलेले सायरन अचानक वाजल्याने मोठ्या आवाजामुळे घरात झोपलेल्या इंगळे यांच्यासह परिसरातील नागरिकांना जाग आली. सायरनचा जोरात आवाज झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना जाग येवून त्यांनी लागलीच इंगळे यांच्या घराकडे धाव घेतली. पळून जात असलेल्या चोरट्यांना नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी त्यांच्या हाताला झटका देवून तेथून पळून गेले.
चोरीच्या दुचाकीवर आले चोरटे दुकान फोडण्यापुर्वी चोरट्यांनी आर. वाय. पार्क परिसरातून दुचाकी चोरली. त्या दुचाकीवरुन ते चोरी करण्यासाठी गेले. परंतू सायरन वाजल्यामुळे चोरट्यांनी आणलेली दुचाकी तेथेच सोडून ते पसार झाले. पोलिसांनी ही दुचाकी जप्त केली आहे. चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी चोरीच्या साहित्यासह त्यांनी धारदार शस्त्रे देखील सोबत आणले होते. हा संपूर्ण प्रकार त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि एलसीबीचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.