रावेर तालुक्यातील सावदा शहरातील घटना
रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सावदा शहरातील महावीर चौकातील रिद्धी ज्वेलर्स या दुकानास सोमवारी सायंकाळी ५ वाजेदरम्यान गॅस गळती झाल्यानंतर अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. तासाभराच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आली आहे.
सावदा शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या गौरव वानखेडे यांच्या मालकीचे रिद्धी ज्वेलर्स या दुकानात सुवर्ण कारागीर सोन्यांचे अलंकार घडवत असताना सिलिंडरची नळी निघाल्यानंतर अचानक आग लागली. दुकानातून धुराचे लोट दिसू लागताच नागरिकांनी धाव घेतली. सुमारे एक तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली.
यावेळी अग्निशमन दलाचे अविनाश पाटील आदींनी आग विझविली. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पंचनामा झाल्यानंतरच नुकसानीचा अंदाज समोर येणार आहे. दरम्यान सावदा शहराचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांच्या भावाचे हे दुकान असून आग विझविण्याकामी त्यांनी मदत केली. आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. यात गौरव वानखेडे या युवा उद्योजकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.