देवदूतासारख्या धावून आलेल्या तरुणाने वाचवले प्राण
सावदा (वार्ताहर):- रावेर तालुक्यातील सावदा येथील ख्वाजा गरीब नवाज नगर भागात एक अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. १० ते १२ रानटी कुत्र्यांच्या झुंडीने एका निष्पाप चिमुरड्याला घेरले असताना, स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता एका तरुणाने धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. ही सर्व थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या बहादूर तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



दोन दिवसांपूर्वी ख्वाजा गरीब नवाज नगर परिसरात एक लहान बालक एकटा असताना अचानक १० ते १२ भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने त्याला लक्ष्य केले. कुत्रे त्या बालकावर तुटून पडणार इतक्यात शेजारीच असलेले शेख बालू शेख मुनीर यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता बालकाच्या दिशेने धाव घेतली. कुत्र्यांना पळवून लावताना शेख बालू यांचा पाय मुरगळला आणि ते जखमी झाले, मात्र त्यांनी जिद्द न हारता बालकाचे प्राण वाचवले.
नगरपालिकेकडून ‘डॉग स्क्वॉड’ पाचारण
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. जागरूक नागरिक शेख बाबू मेंबर, पत्रकार फरीद शेख, युसूफ शाह आणि शेख मुख्तार यांनी तातडीने नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधून आक्रमक कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्याधिकारी भूषण वर्मा आणि आरोग्य विभागाने त्वरित पावले उचलली. मुक्ताईनगर येथून विशेष ‘श्वान पथक’ (Dog Squad) बोलावण्यात आले.२ एप्रिल रोजी सावदा शहरात विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत परिसरातील सुमारे २५ आक्रमक कुत्र्यांना पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
या मोहिमेवेळी नगराध्यक्षा रेणुका पाटील, आरोग्य सभापती प्रतीक्षा भंगाळे, शिक्षण सभापती सचिन भराटे आणि सामाजिक कार्यकर्ता बाबू मेंबर यांच्यासह पालिकेचे कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सध्या परिसरात शेख बालू शेख मुनीर यांच्या धाडसाची चर्चा असून, एका मोठ्या संकटातून बालकाला सुखरूप बाहेर काढल्याबद्दल त्यांचे आभार मानले जात आहेत.









