पाचोरा तालुक्यात सावरखेडा येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावरखेडा येथील श्री भैरवनाथ महाराज मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिला चोरटीला पोलिसांनी तत्परतेने अटक केली आहे. ही घटना ११ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.

फिर्यादी अरुणा ज्ञानेश्वर पाटील (वय ३०, रा. कवली, ता. सोयगाव) या सावरखेडा येथील भैरवनाथ महाराज मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेऊन एका महिला चोरटीने अरुणा यांच्या गळ्यातील ७,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने (२ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या वाट्या आणि १ ग्रॅमचे सोन्याचे मणी) अतिशय शिताफीने तोडून चोरले.
चोरीची बाब लक्षात येताच अरुणा पाटील यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून वर्षा जैस्वाल चव्हाण (रा. टाकळी जीवरांग, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) या संशयित महिलेला ताब्यात घेतले. चौकशीअंती तिने चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तिला ११ जानेवारी रोजी रात्री १०.५५ वाजता अटक केली आहे.
या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई प्रभारी अधिकारी सपोनि कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार किरण ब्राह्मणे करत आहेत.









