जळगावात ‘अमृत प्री-स्कूल’चे स्नेहसंमेलन उत्साहात
जळगाव (प्रतिनिधी): गुजराल पेट्रोल पंप परिसरातील गौरवास्पद ‘अमृत प्री-स्कूल’चा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी चिमुकल्यांनी सादर केलेल्या “सत्ययुग ते कलियुग – एक मानवी देहाचा प्रवास” या विशेष नाटकाने उपस्थितांची मने जिंकून घेतली.

शनिवार, १० जानेवारी रोजी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वैशाली गालापुरे, व्हि. टी. गालापुरे (सेवानिवृत्त प्राचार्य) होते. प्रमुख पाहुणे म्हणून धरणगाव पी. आर. हायस्कूलचे डायरेक्टर रामदास अलई (चांदवड) उपस्थित होते. व्यासपीठावर शाळेच्या प्राचार्या पुजा अमृतकर व चेअरमन धनंजय अमृतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्नेहसंमेलनात बालगोपालांनी आपल्या कलागुणांचे बहारदार सादरीकरण केले. यात प्रामुख्याने नृत्यप्रकारमध्ये एकल नृत्य, समूह नृत्य, टॉलीवूड डान्स आणि लावणी, गायन व नाट्य प्रकारात चिमुकल्यांनी गीतगायन व नाटकाद्वारे प्रेक्षकांची दाद मिळवली.
विविध स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट, मेडल, ट्रॉफी व बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. शाळेच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या शिक्षिका कोमल कुलकर्णी, पुजा पाटील, निकिता जाधव, हेमांगी देशमुख, रुपाली पाटील व माधुरी देवरे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच राजश्री व मोनाली यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शिक्षिका हेमांगी देशमुख व पुजा पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार निकिता जाधव यांनी मानले. या यशस्वी आयोजनामुळे अमृत प्री-स्कूलच्या शैक्षणिक व सांस्कृतिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.










