नेत्यांच्या एकमेकांशी गाठीभेटी वाढल्या, ‘संकटमोचकां’ची चर्चा विफल ?
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :- शपथविधीची तारीख ठरली असली तरीही राज्याच्या सत्तास्थापनेला प्रचंड उशीर होत आहे. याचे कारण महत्वाचे ‘गृहखाते’ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर, निकाल लागून १० दिवस झाले तरीही महायुतीत बेबनाव असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. नेत्यांची गाठीभेटी वाढल्या आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचले आहेत. याआधी संकटमोचक गिरीश महाजन हे शिंदेंच्या भेटीला गेले होते.
राज्यात मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमेचे मंत्री असावेत. भ्रष्टाचारी मंत्री नको. तसेच भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या आमदारांना मंत्रीपद दिले जाणार नाही हे सूत्र महायुतीत जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे अनेक माजी मंत्र्यांचे धाबे दणाणले आहे. तर नवीन चेहऱ्यांना मंत्री केले जाणार असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातून देखील नवीन मंत्री पाहायला मिळणार असे दिसून येत आहे. तर ‘गृहखात्या’वरून महायुतीतील भाजप, शिवसेना यांच्यात ताणाताणी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या वजनदार खात्याच्या मंत्रीपदी आता फडणवीस कि शिंदे याबाबत कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
दुसरीकडे महायुतीत कोठेतरी बेबनाव असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या भेटीला संध्याकाळी गिरीश महाजन जाऊन आले. त्यांच्याशी चर्चा आटोपून महाजन ‘वर्षा’ बंगल्यावर निघाले. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे शिंदेंच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे ‘संकटमोचकां’ना दिलेली जबाबदारी अपयशी झाली काय ? त्यासाठी अखेर फडणवीस यांनाच ‘वर्षा’ बंगल्यावर यावे लागले आहे का ? अशा चर्चा जोर धरत आहेत. अखेर मंत्रीमंडळात मिळणाऱ्या खातेवाटपात कुठेतरी तिढा चांगलाच रंगल्याचे अंतर्गत चित्र आता समोर येत आहे.